जळगाव समाचार | बुधवार, २३ एप्रिल २०२५
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाला असून, अनेक पर्यटक जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी ‘द रेजिस्टन्स फ्रंट (TRF)’ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.
या हल्ल्यात भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल शहीद झाले. हरियाणातील करनाल येथील सेक्टर 7 मध्ये राहणारे विनय दोन वर्षांपूर्वीच नौदलात दाखल झाले होते. ते आणि त्यांची पत्नी श्रीनगरमध्ये पर्यटनासाठी गेले होते. तिथून ते पहलगामला पोहोचले असताना अचानक दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात विनय शहीद झाले, तर त्यांची पत्नी बचावली.
नरवाल यांच्या पत्नीने अश्रूंमधून आपली आपबिती सांगताना सांगितले की, हल्लेखोराने त्यांच्या पतीला ‘तू मुसलमान आहेस का?’ असा प्रश्न विचारला, आणि नाही म्हणताच गोळी झाडली.
हल्ल्यात हैदराबाद येथील IB चे अधिकारी मनिष रंजन सुद्धा शहीद झाले. त्यांच्या पत्नी आणि मुलांसमोरच त्यांच्यावर गोळीबार झाला. हल्ल्यानंतर अनेक पर्यटक अडकले होते, मात्र त्यातील अनेकजण सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
या दुर्दैवी घटनेचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडीओत एक महिला आपल्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पतीसाठी मदतीची आर्त विनंती करताना दिसते. या घटनेने संपूर्ण देशाला हादरला आहे.