ठरलं तर दहावी-बारावीचा निकाल मे महिन्यात लागणार…


जळगाव समाचार | बुधवार, २३ एप्रिल २०२५

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी – मार्च मध्ये घेतलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल मे महिन्यात जाहीर होणार आहेत. यावर्षी निकाल प्रक्रिया अधिक जलद पार पडत असून तब्बल २१ लाख विद्यार्थ्यांचे निकाल डिजिलॉकर अ‍ॅपमध्ये थेट उपलब्ध होणार आहेत.

राज्य मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी मंडळाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे.

डिजिलॉकरवर निकाल कसा पाहावा?

यंदा २१ लाख विद्यार्थ्यांचे अपार आयडी (Aadhaar आधारित यूनिक आयडी) तयार झाले आहेत. या विद्यार्थ्यांचे निकाल थेट डिजिलॉकर अ‍ॅपवर कायमस्वरूपी स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. यामुळे भविष्यात शिक्षण, नोकरी किंवा अन्य शासकीय सेवांसाठी या निकालाचा सहज उपयोग करता येईल.

जे विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार झालेले नाहीत, त्यांनी आपला निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

निकाल प्रक्रियेतील वेग:
• यंदा परीक्षा दरवर्षीपेक्षा १०–१५ दिवस अगोदर झाल्या.
• परीक्षा सुरू असतानाच पेपर तपासणीला सुरुवात झाली.
• शिक्षकांनी यावर्षी तपासणीवर बहिष्कार घातला नाही.
• क्रीडागुण आणि प्रात्यक्षिक गुण वेळेत ऑनलाईन पद्धतीने प्राप्त.
• शाळा आणि महाविद्यालयांकडून अपार आयडी वेळेत प्राप्त झाले.

महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर

महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे जिथे ८७ टक्के विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी ६० ते ६५ टक्के अपार आयडी मंडळाकडे प्राप्त झाले आहेत.

यामुळे लाखो विद्यार्थ्यांना डिजिटली निकाल पाहण्याची सुविधा मिळणार असून पारंपरिक मार्कशीटची आवश्यकता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

राज्याचे प्रशासन, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या सहकार्याने दहावी-बारावीच्या परीक्षा चांगल्या पद्धतीने पार पडल्या. किरकोळ घटना वगळता यंदा कॉपी करण्याच्या घटनादेखील कमी झाल्या. परीक्षोत्तर जे काम आहे, यामध्ये पेपर तपासणारे शिक्षक आणि मॉडरेटर यांनी दिलेल्या वेळेत त्यांचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे राज्य मंडळाने यंदा पहिल्यांदाच दहावी-बारावीचा निकाल 15 मेपर्यंत जाहीर करण्याचे जे आश्वासन दिले होते, त्यानुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
– शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here