पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला; २७ हून अधिक पर्यटकांच्या मृत्यूची शक्यता, महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा समावेश…


जळगाव समाचार | २१ एप्रिल २०२५

जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पहलगाम येथे आज (रविवार) दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार करत पर्यटकांवर हल्ला केला. या भीषण हल्ल्यात २७ हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा समावेश असून त्यांची नावे अतुल मोने आणि दिलीप डिसले अशी आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गोळीबाराची घटना पहलगामच्या बैसरन परिसरात घडली. हे ठिकाण गवताळ असून पर्यटकांमध्ये नेहमीच लोकप्रिय असते. या भागात वाहतूक व्यवस्था नाही आणि तेथे पोहोचण्यासाठी केवळ पायवाटेचा वापर करावा लागतो. हल्ल्याच्या वेळी परिसरात अनेक पर्यटक उपस्थित होते.

गोळीबार होताच एक महिला पर्यटक फोनवरून घटनास्थळी काय घडलं हे सांगत होती. तिच्या सांगण्यानुसार, हल्ला अचानक झाला आणि अनेक जण त्या ठिकाणी अडकले होते. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलांच्या तुकड्या तत्काळ घटनास्थळी रवाना झाल्या असून, परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

प्रशासनाकडून अद्याप मृतांच्या अधिकृत संख्येबाबत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, हल्ला अतिशय गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अनेक पर्यटक गंभीर जखमी झाल्याचंही समजतं आहे.

सध्या पहलगाम परिसरात तणावपूर्ण स्थिती असून, सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. बैसरन परिसर पूर्णतः बंद करण्यात आला असून, शोध मोहीमेला प्राधान्य दिलं जात आहे.

ही घटना काश्मीरमधील पर्यटनसुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं करत आहे. केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन या हल्ल्यामागील दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, देशभरातून या हल्ल्याचा तीव्र निषेध केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here