जळगाव समाचार | २१ एप्रिल २०२५
रविवारी पहाटे ३ वाजता वैजापूर शहरातील स्टेशन रोड परिसरात असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरीचा प्रयत्न झाला. शटर तोडून आत शिरलेल्या चोरट्यांनी तिजोरी फोडण्यासाठी गॅस कटरचा वापर केला, मात्र त्यात स्फोट झाला आणि बँकेत आग लागली. या आगीत बँकेतील फर्निचर, संगणक, कागदपत्रे जळून १५ लाख रुपयांचे नुकसान झाले.
स्फोटाचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक जागे झाले आणि चोरटे स्विफ्ट कार (MH 14 BX 7988) बँकेबाहेरच टाकून पळून गेले. पोलिसांनी पाठलाग केला, मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे फरार झाले.
सुदैवाने, स्ट्रॉंग रूममधील साडेचार लाख रुपये व दागिने सुरक्षित राहिले आहेत. बँकेतील डेटा ऑनलाइन असल्याने बॅकअप उपलब्ध आहे व ग्राहकांना चिंता करण्याचे कारण नाही, असे जनरल मॅनेजर डी. एम. कावेरी यांनी सांगितले. ग्राहक सेवा अन्य केंद्रांवरून सुरू राहतील.
बँकेत त्या वेळी सुरक्षा रक्षक नव्हता आणि सीसीटीव्ही यंत्रणा देखील आगीत जळाली. चोरट्यांची स्विफ्ट कारमधून टॉमी, कोयता, इलेक्ट्रिक कटर, स्क्रू ड्रायव्हर आणि दोन बनावट नंबर प्लेट्स सापडल्या आहेत.
बँक व्यवस्थापक बजरंगलाल ढाका यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरांचा माग काढण्याचे काम सुरू आहे.