जळगाव समाचार | २१ एप्रिल २०२५
जागतिक बाजारातून मंदीचे संकेत असतानाही भारतीय शेअर बाजारात सोमवारी (दि. २१ एप्रिल) उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सेन्सेक्सने दिवसाची सुरुवात तब्बल ६०० हून अधिक अंकांच्या वाढीसह केली आणि तो ७९,१८० या पातळीवर पोहोचला. तर निफ्टीमध्येही १८० अंकांची वाढ होऊन तो २४,००० च्या वर गेला.
विशेष म्हणजे बँकिंग क्षेत्रातील शेअर्सनी आज जोरदार कामगिरी केली असून बँक निफ्टीने इतिहास रचला आहे. बँक निफ्टीने पहिल्यांदाच ५५,००० चा टप्पा पार केला असून सुरुवातीच्या व्यवहारात त्यात ९०० अंकांची म्हणजेच १.६ टक्क्यांची वाढ झाली आहे.
रियल्टी आणि हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्समध्येही तेजी दिसून आली.
सेन्सेक्सवरील ॲक्सिस बँकेचा शेअर आज ३ टक्क्यांनी वाढून टॉप गेनर ठरला आहे. टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक आणि इन्फोसिस यांच्यातही १ ते ३ टक्क्यांची वाढ झाली.
दुसरीकडे अदानी पोर्ट्सचा शेअर २.५ टक्क्यांनी घसरला. टायटन, नेस्ले इंडिया, सन फार्मा, आयटीसी आणि एशियन पेंट्स यांचे शेअर्सही १ ते २ टक्क्यांनी खाली आले.
गेल्या आठवड्यात सुट्ट्यांमुळे केवळ तीनच दिवस व्यवहार झाला होता, मात्र त्या दिवसांतही बाजार तेजीत राहिला. याचाच परिणाम म्हणजे या आठवड्याची सुरुवातही तेजीने झाली आहे.

![]()




