जळगाव समाचार | १८ एप्रिल २०२५
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे एका महिला वकिलावर सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गावातील ध्वनी प्रदूषणावर तक्रार केल्याचा राग मनात धरून हा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
महिला वकिलाने मायग्रेनच्या त्रासामुळे गावातील लाऊडस्पीकरचा आवाज कमी करावा, पिठाच्या गिरण्या काढाव्यात अशी तक्रार केली होती. या कारणावरून सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिला शेतात रिंगण करून काठ्या आणि पाईपने मारहाण केली. यात महिला बेशुद्ध झाली असून प्राथमिक उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आले आहे.
या हल्ल्यात सरपंचासह दहा जण सामील असल्याची माहिती असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बीड जिल्ह्यात याआधीही सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. आता या घटनेमुळे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.