शनिपेठ पोलिसांची कारवाई; गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसांसहित दोघांना अटक…


जळगाव समाचार | १७ एप्रिल २०२५

शहरातून गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे घेऊन फिरणाऱ्या एका इसमाला शनिपेठ पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या कबुलीनंतर आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांनी मिळून ५४ हजार रुपयांत कट्टा खरेदी-विक्री केल्याची माहिती समोर आली आहे.

शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, राकेश दिलीप भावसार (वय ४१, रा. सदाशिवनगर, जळगाव) हा गावठी कट्टा घेऊन ज्ञानदेवनगर ते काशिनाथ नगर रोड परिसरात फिरत असल्याचे समजले. त्यानुसार पोउनि योगेश ढिकले व त्यांच्या पथकाने कारवाई करत राकेश भावसार याला अटक केली.

त्याच्याकडे झडती घेतली असता, त्याच्या कमरेला खोचलेला देशी बनावटीचा लोखंडी कट्टा आणि चार जिवंत काडतुसे मिळाली. पुढील चौकशीत राकेश भावसारने हा कट्टा ६ एप्रिल २०२५ रोजी ज्ञानदेवनगर येथील मित्र प्रसाद संजय महाजन (वय २८) याच्याकडून ५४,००० रुपये रोख रकमेने विकत घेतल्याची कबुली दिली.

यानंतर पोलिसांनी प्रसाद महाजन यालाही ताब्यात घेतले असून, दोघांनी मिळून विनापरवाना गावठी कट्टा खरेदी-विक्री केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक साजिद मन्सुरी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here