जळगाव समाचार | १७ एप्रिल २०२५
यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात बिबट्याने एका दोन वर्षाच्या चिमुरडीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेनंतर संपूर्ण तालुक्यात भीतीचं आणि संतापाचं वातावरण आहे.
प्रभाकर चौधरी यांच्या शेतात ठेलारी समाजातील एक मेंढपाळ कुटुंब वास्तव्यास होते. पहाटे १ वाजेच्या सुमारास बिबट्याने त्यांच्या दोन वर्षाच्या मुलीला उचलून नेल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. काही वेळातच या चिमुकलीचा मृतदेह जवळच्या शिवारात सापडला. तिच्यावर बिबट्याने अत्यंत अमानुषपणे हल्ला केल्याचे स्पष्ट झाले असून मृतदेहाचे लचके तोडलेले दिसून आले.
मागील दोन आठवड्यांतील यावल तालुक्यातील ही दुसरी घटना असून, बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी आणि मजूर भयभीत झाले आहेत. अनेकजण शेतीकामासाठी शेतात जाण्यास टाळाटाळ करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाने तातडीने वन विभागाला कळवले. यावल तहसीलदार आणि वनपरिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील कारवाई सुरू आहे.
स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी वनविभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली असून, बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने विशेष पथक आणि तज्ञ मागवण्याची मागणी केली आहे.
तालुक्यात बिबट्याचा बंदोबस्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.