जळगाव समाचार | १५ एप्रिल २०२५
शेतीच्या वादातून मेव्हण्यांनी हल्ला केल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या तौफिक कय्यूम पिंजारी (वय ३२, रा. सदाशिवनगर, शेरा चौक, मेहरुण) या तरुणाचा अखेर मृत्यू झाला. सोमवारी (१४ एप्रिल) पहाटेच्या सुमारास त्याने शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
तौफिक हा मालवाहू रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करत होता. काही दिवसांपासून त्याचा मेहुणे अस्लम सशोद्दीन पिंजारी व शफिक गफूर पिंजारी यांच्याशी शेतजमिनीच्या वारसावरील हक्कावरून वाद सुरू होता. ११ एप्रिल रोजी दोघांनी तौफिकच्या घरी जाऊन त्याच्यावर शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी अस्लमने तौफिकच्या पोटाजवळ चाकूने वार केला.
गंभीर जखमी अवस्थेत तौफिक याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सोमवारी त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन्ही मेव्हण्यांविरोधात आधीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता तौफिकच्या मृत्यूनंतर या गुन्ह्यात खूनाचा कलम वाढवण्यात आला आहे. दोघेही आरोपी सध्या फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
तौफिकच्या मृत्यूनंतर रुग्णालयात नातेवाईक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.