जळगाव समाचार | १२ मार्च २०२५
जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना अज्ञात व्यक्तीकडून ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीचा ईमेल थेट मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवण्यात आला असून, संपूर्ण प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी यासंदर्भात तातडीने पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकाराबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “सदर ईमेल मागील महिन्यात प्राप्त झाला होता. त्यानंतर आम्ही सखोल तपास सुरू केला आहे. सायबर सेलसह विविध पथकांमार्फत अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.”
पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले की, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जीवे मारण्याच्या इशाऱ्यांचा उल्लेख मेलमध्ये असून, याप्रकरणी गंभीरतेने कारवाई केली जात आहे. प्रशासन व पोलीस विभाग सतर्क आहेत.
अफवांना बळी पडू नका – पोलिसांचे आवाहन
डॉ. रेड्डी म्हणाले, “अशा स्वरूपाचे मेल अनेकदा येत असतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता पोलिस प्रशासनावर विश्वास ठेवावा. कोणत्याही अफवांना बळी पडू नये.”
या प्रकरणामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, पोलिसांनी दिलेल्या खात्रीमुळे वातावरण स्थिर आहे. प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क असून, लवकरच या प्रकरणातील दोषी व्यक्तीला ओळखून योग्य ती कारवाई केली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.