अमळनेर तालुक्यात अचानक आग लागून ६-७ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; गावकऱ्यांच्या धाडसाने मोठा अनर्थ टळला…


जळगाव समाचार | १२ एप्रिल २०२५

मारवड येथील डांगरी रस्त्यालगत असलेल्या खळवाडीत ११ एप्रिल रोजी दुपारी तीनच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत सुमारे पाच ते सहा शेतकऱ्यांचे खळ्यातील शेती साहित्य, एक ट्रॅक्टर, चारा, लाकडी अवजारे असे सगळे साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने जनावरे वाचवण्यात यश आले.

आगीची माहिती मिळताच अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन अग्निशमन बंब पाठवण्यात आले. तसेच चोपडा, एरंडोल आणि धरणगाव येथूनही बंब मागविण्यात आले. अग्निशमन दलाचे कर्मचारी गणेश गोसावी, दिनेश बिऱ्हाडे, फारुख शेख, जफर पठाण, मच्छिंद्र चौधरी, आनंद झिम्बल, आकाश बाविस्कर, भिका संदानशिव यांनी आग आटोक्यात आणली.

घटनेनंतर उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, एपीआय जीभाऊ पाटील, तलाठी महेंद्र भावसार, मंडळाधिकारी, तसेच गावातील पोलीस आणि नागरिक घटनास्थळी दाखल झाले.

गावातील तरुणांनी तात्काळ नळांची व्यवस्था करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. कुणी चारा बाजूला करत होते, कुणी पाणी टाकत होते, तर काही तरुण बादल्या भरून आग विझवण्यासाठी धावपळ करत होते. अग्निशमन दल येईपर्यंत या तरुणांनी दाखवलेली तत्परता आणि धाडस सर्वत्र कौतुकास्पद ठरले आहे.

या आगीत सुमारे सात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, प्रशासनाने योग्य ती मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here