जळगाव समाचार | 11 एप्रिल 2025
दगडी पुलाखालील नाल्यात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार १० एप्रिल रोजी सायंकाळी उघडकीस आला. सायंकाळी सहा वाजता ही माहिती पोलिसांना मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
सध्या मृत तरुणाची ओळख पटलेली नसून, हा घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. परिसरातील नागरिकांच्या माहितीनुसार, दगडी पुलाजवळ अवैध दारूविक्री सुरू असून, येथे सकाळी सहा वाजेपासून रात्री अकरा वाजेपर्यंत युवकांची गर्दी असते. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही कोचिंग क्लासेस जवळच असल्यामुळे विद्यार्थ्यांनाही त्रास होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती.
दरम्यान, रात्री उशिरा काही युवकांमध्ये वाद होऊन या तरुणाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतदेह नाल्यात फेकून आरोपी फरार झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी मृतदेह नाल्यातून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला असून, पुढील तपास सुरू आहे.