राज्यात ३६०० मेगावॅट विजेची तूट; नाशिक व भुसावळात नवीन वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचे महा निर्मितीचे नियोजन…

जळगाव समाचार | ११ एप्रिल २०२५

राज्यात सध्या ३६०० मेगावॅट विजेची तूट असून ही तूट भरून काढण्यासाठी ‘महानिर्मिती’कडून नाशिक व भुसावळ येथे नवीन वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणी ८०० मेगावॅट क्षमतेचे संच उभारण्यात येणार असून हे प्रकल्प सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित असणार आहेत.

नवीन प्रकल्प उभारणीसाठी ‘महानिर्मिती’ने मे. मेकॉन कन्सल्टिंग सर्व्हिसेस या खासगी कंपनीमार्फत जागा, पाणी, कोळसा व मनुष्यबळ आदींचे सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणाच्या अहवालानंतर राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवून मंत्रिमंडळाची मंजुरी घेण्यात येणार आहे.

सध्या भुसावळ औष्णिक केंद्रात २१०, ५०० आणि ६६० मेगावॅट क्षमतेचे संच कार्यरत आहेत. नाशिक केंद्रात प्रत्येकी २१० मेगावॅटचे तीन संच आहेत. यातील २१० मेगावॅटचे संच जुने असून भविष्यात ते बंद होतील. त्यांच्या जागी नवीन संच बसवले जाणार आहेत.

राज्यात सध्या वीज मागणी २९ हजार ५०० मेगावॅटवर पोहोचली असून महा निर्मितीची सध्याची उत्पादन क्षमता १३ हजार ८३५ मेगावॅट आहे. उर्वरित वीज खासगी व केंद्र सरकारच्या माध्यमातून विकत घ्यावी लागते. वाढती मागणी लक्षात घेता नाशिक व भुसावळातील नवीन प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

या प्रकल्पांची यशस्वी उभारणी झाल्यास राज्यातील वीज तूट काही प्रमाणात भरून निघेल आणि भुसावळला सुपर थर्मल पॉवर स्टेशनचा दर्जा मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here