जळगाव समाचार | ८ एप्रिल २०२५
महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या ३० एप्रिल २०२५, अक्षय तृतीयेच्या दिवशी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. राज्य सरकारकडून याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली असून, अनेक महिलांना या हप्त्याची प्रतीक्षा आहे.
महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने जुलै २०२४ मध्ये सुरू केली होती. दरमहा पात्र महिलांच्या खात्यात ठरावीक रक्कम जमा केली जाते. आतापर्यंत २.५ कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा फायदा मिळाला आहे.
तथापि, वयाची अट पार केलेल्या महिलांना योजनेतून वगळले जात आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर माहिती दिली की, ही योजना २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी आहे. त्यामुळे वयोमर्यादा ओलांडणाऱ्या १.२० लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. याशिवाय, लग्नानंतर इतर राज्यात स्थायिक झालेल्या महिलांनाही योजना लागू राहणार नाही.
दरम्यान, ११ लाख अर्ज अयोग्य ठरले आहेत. काही महिलांनी चुकीच्या पद्धतीने योजना मिळवली होती, यामुळे जानेवारीपासून पात्रतेची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात लाभार्थी महिलांची संख्या वाढेल की घटेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या योजनेमुळे अनेक महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडल्याचा दावा सरकारने केला आहे.