जळगाव समाचार | ८ एप्रिल २०२५
जळगाव महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात तहसीलदारांच्या बनावट सही आणि शिक्क्यांचे अर्ज आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एकूण ४३ जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी वकीलांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शेख मोहम्मद रईस बागवान (रा. शाहूनगर, जळगाव) आणि शेख मोहसीन शेख सादिक (रा. मणियार पिंप्राळा, जळगाव) अशी आहेत. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रकरणात ५० बनावट दाखल्यांमध्ये तहसीलदारांच्या नकली सही व शिक्क्यांचा वापर झाल्याचे उघड झाले होते. यामुळे महापालिकेने तहसीलदार शितल राजपूत यांना चौकशीसाठी पत्र पाठवले होते. चौकशीनंतर नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला.
हे प्रकरण बांगलादेशी नागरिकांशी संबंधित असल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.