जळगाव समाचार | ८ एप्रिल २०२५
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिलला घेतलेल्या पत्रकार परिषदेत चीन आणि भारतासह विविध देशांवर ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ लादण्याची घोषणा केली. याचे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसू लागले असून, जर्मनीने अमेरिकेत ठेवलेले १२०० टन सोने परत मागण्याची तयारी सुरू केली आहे. या सोन्याची किंमत सुमारे १२० अब्ज डॉलर्स आहे.
सध्या भारतात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९० हजारांवर पोहोचला आहे, तर दिल्लीतील काही बाजारात हे दर ९४ हजार रुपयांवर गेले आहेत. काही विश्लेषकांनी अंदाज वर्तवला आहे की लवकरच सोन्याचे दर १ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतात. मात्र दुसरीकडे, मार्केट तज्ज्ञांच्या मते सोन्याचे दर ४० टक्क्यांनी घसरून ५५ हजार रुपयांपर्यंत येऊ शकतात.
सोन्याच्या दरातील घट का?
• जागतिक बाजारात सोन्याचा पुरवठा वाढला आहे.
• मागणीमध्ये घट झाली आहे.
• वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या सर्वेक्षणानुसार ७१ टक्के केंद्रीय बँका आपला सोन्याचा साठा घटवण्याचा विचार करत आहेत.
• मॉर्निंगस्टारच्या अमेरिकन विश्लेषकांनी पुढील काही वर्षांत सोन्याच्या किमती ३८ टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
सध्या जागतिक बाजारात सोन्याचे दर प्रति औंस ३१०० डॉलर्सपेक्षा जास्त आहेत. मात्र, महागाई, आर्थिक अनिश्चितता आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केल्याने दर वाढले होते. आता या साठ्याचा परिणाम म्हणून किंमती घसरण्याची शक्यता आहे.
सराफा बाजारातील व्यापाऱ्यांमध्येही या चर्चेमुळे चिंता निर्माण झाली असून, येणाऱ्या काळात सोन्याच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळण्याची शक्यता आहे.