जळगाव समाचार | ८ एप्रिल २०२५
नाशिक जिल्ह्यातील घोटी शहरातील एका खासगी शाळेत आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरातून धक्कादायक वस्तू सापडल्या आहेत. उपमुख्याध्यापकांनी अचानक दप्तरांची तपासणी केली असता काही विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या बॅगेत चाकू, फायटर, सायकलची चेन, लोखंडी कडे, कंडोम आणि अमली पदार्थ आढळून आले.
ही घटना उघडकीस आल्यानंतर शाळा प्रशासनाने संबंधित विद्यार्थ्यांना शिस्तभंगाची शिक्षा दिली असून त्यांच्या पालकांना शाळेत बोलावून समज देण्यात आली आहे. पालकांकडून लेखी हमीही घेतली गेली आहे.
या प्रकरणानंतर शाळा प्रशासनाने आता ठरवले आहे की, यापुढे दररोज विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी केली जाणार आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या वस्तू आढळल्यास पालकांसह पोलिसांनाही बोलावण्यात येईल, असे शाळेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रकारामुळे विद्यार्थी नक्की कुठल्या वाईट प्रवृत्तीच्या आहारी जात आहेत, याचा विचार पालक व शिक्षकांना करावा लागणार आहे.