मंत्री गिरीश महाजनांचा एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध; एकनाथ खडसेंचे गंभीर आरोप…

जळगाव समाचार | ६ एप्रिल २०२५

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री आणि आमदार गिरीश महाजन यांच्यावर खळबळजनक आरोप करत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. खडसेंनी असा दावा केला आहे की, गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी वैयक्तिक संबंध आहेत. तसेच या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे कॉल डिटेल्सचा पुरावा असल्याचा खडसेंचा आरोप आहे.

एकनाथ खडसे म्हणाले की, “गगनभेदी या वृत्तपत्राचे पत्रकार अनिल थत्ते यांनी गिरीश महाजन यांच्या संदर्भातील एक क्लिप व्हायरल केली असून त्यात ‘गिरीश महाजन यांचे रात्री रंगलेले संबंध’ याबाबत थत्तेंनी सविस्तर माहिती दिली आहे. मी त्या क्लिपनुसारच बोलत आहे. मला त्या आयएएस अधिकाऱ्याचं नाव माहित आहे, पण नैतिकतेच्या दृष्टीने मी ते उघड करणार नाही.”

खडसेंनी पुढे म्हटले की, “अमित शाह आणि गिरीश महाजन यांच्यात मंत्रीमंडळ विस्ताराच्या वेळी झालेल्या चर्चेवेळीही हा विषय चर्चेला आला होता. अमित शाह यांनी महाजन यांना त्यांचे कॉल डिटेल्स दाखवले होते आणि विचारले होते की, रात्री एकच्या सुमारास सतत महिला अधिकाऱ्यांना का फोन केले गेले? यावर महाजन म्हणाले की, ते फक्त कामाच्या निमित्ताने होते. पण शंभराहून अधिक कॉल झाल्याचे सीडीआर (Call Detail Record)मध्ये स्पष्ट दिसते.”

खडसे यांनी असेही सुचवले की, “महाजन यांचे मागील दहा वर्षांचे कॉल डिटेल्स तपासल्यास सर्व सत्य समोर येईल. मी स्वतः अमित शाह यांची भेट घेणार असून याविषयी सविस्तर माहिती विचारणार आहे.”

या आरोपांवर गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी खडसेंवर निशाणा साधत म्हटले, “त्यांना कमरेखाली वार केल्याशिवाय दुसरे काही जमत नाही. त्यांनी अनेकदा खोट्या आरोपांचे सोंग आणले आहे. आता त्यांच्या बोलण्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही. ते राजकारणातून संपले आहेत, त्यांचे दुकान बंद झाले आहे. म्हणून ते काहीही बरळतात.”

महाजन पुढे म्हणाले, “ते म्हणतात की, त्यांच्याकडे पुरावे आहेत. मग तो पुरावा लोकांसमोर का मांडत नाहीत? खोटं बोलणं, लोकांना दिशाभूल करणं आणि चरित्रहण करणं हेच त्यांचं काम उरलं आहे. त्यांनी जर एक पुरावा दाखवला, तर मी सक्रिय राजकारणातून निवृत्त होईन. पण त्यांच्या तोंडातून नेहमीच काल्पनिक गोष्टीच बाहेर येतात.”

तसंच महाजन यांनी खडसेंना इशारा देत म्हटलं की, “माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. मी खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही, पण गरज पडली तर मीही तोंड उघडेन, तेव्हा परिस्थिती वेगळी असेल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here