जळगाव समाचार | ५ एप्रिल २०२५
यावल येथील माहेर असलेल्या २९ वर्षीय विवाहितेवर पतीकडून अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला असून, सासरे आणि नंदोईनेही तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेचा विवाह भुसावळ येथील तरुणाशी झाला होता. विवाहानंतर पतीने तिच्यावर माहेरून बांधकाम व्यवसायासाठी २५ लाख रुपये आणण्याचा दबाव टाकला. पैसे न आणल्याने पतीने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. एवढ्यावरच न थांबता, सासरे आणि नंदोईनेही तिच्यावर जबरदस्ती केली.
यासोबतच या प्रकाराबाबत कुणाला काही सांगितल्यास तुला, तुझ्या वडिलांना आणि भावाला ठार मारू, अशी धमकी दिल्याचेही पीडितेने आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे. हा संपूर्ण प्रकार ११ ऑक्टोबर २०२० ते ९ ऑगस्ट २०२१ दरम्यान घडल्याचे सांगण्यात आले.
या घटनेवर आधारित फिर्याद यावल पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी संबंधित सात जणांविरोधात संबंधित कायद्यांखाली गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.