जळगाव समाचार | ५ एप्रिल २०२५
पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सध्या दोन गंभीर कारणांमुळे चर्चेत आहे. एका गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न दिल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप होत असतानाच, दुसरीकडे या रुग्णालयाने गेल्या सहा वर्षांपासून महापालिकेला एक रुपयाचाही कर भरलेला नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तनिषा भिसे नावाच्या गर्भवती महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालय प्रशासनाने उपचार सुरू करण्यासाठी थेट 10 लाख रुपयांची मागणी केली. कुटुंबाकडे सध्या फक्त दोन लाख रुपये आहेत, अशी विनंती करूनही रुग्णालयाने उपचार सुरू केले नाहीत. त्यामुळे तनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना तिची प्रकृती अधिक खालावली आणि दोन जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे पुण्यात संतापाची लाट उसळली आहे.
याचवेळी, महापालिकेच्या नोंदीनुसार, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तब्बल 27 कोटी 38 लाख 62 हजार 874 रुपयांचा मिळकत कर थकवला आहे. धर्मादाय रुग्णालय असतानाही इतका मोठा कर थकवल्यामुळे रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
या प्रकरणानंतर धर्मादाय आयुक्त कार्यालयाने रुग्णालयाच्या चौकशीसाठी समितीची स्थापना केली असून, रुग्णालयांनी नियमांचं पालन केलं आहे का, याची तपासणी केली जाणार आहे. राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांना निर्धन आणि दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी आरक्षित खाटा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
हा प्रकार पाहता, ‘धर्मादाय’ नावाखाली चालवलं जाणारं हे रुग्णालय खरोखरच सेवाभावासाठी आहे का, की नफा कमावणाऱ्या संस्थेसारखं वागतंय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.