“घरबसल्या पैसे कमवा” म्हणत ६१ लाख गमावले! अभिनेता सागर कारंडे सायबर फसवणुकीचा बळी…

जळगाव समाचार | ४ एप्रिल २०२५

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून प्रसिद्ध झालेले अभिनेता सागर कारंडे सायबर फसवणुकीचा बळी ठरले आहेत. एका अनोळखी महिलेकडून “इंस्टाग्राम पोस्ट लाइक करा आणि पैसे कमवा” असा संदेश आल्यानंतर सागरने त्या कामात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र, यामागे मोठा सायबर फसवणुकीचा कट असल्याचे उघड झाले असून त्यांना ६१.८३ लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.

फेब्रुवारी महिन्यात सागर कारंडे यांना व्हॉट्सअ‍ॅपवरून एक मेसेज आला. त्यात असं सांगण्यात आलं होतं की, इंस्टाग्राम पोस्टला लाईक केल्यास १५० रुपये मिळतील. हे काम घरी बसून करता येईल असे वाटल्याने सागरने या संधीचा स्वीकार केला. सुरुवातीला त्यांना काही लहान टास्क देण्यात आले आणि त्यावर पैसेही मिळाले.

पुढे सागरला मोठ्या कामासाठी आधी २७ लाख रुपयांची गुंतवणूक करायला सांगितली. टास्क पूर्ण केल्यानंतर सागरने वॉलेटमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, पण पैसे अडवून ठेवण्यात आले. त्यानंतर पुन्हा १९ लाख रुपये आणि त्यावर ३० टक्के कर भरण्याची मागणी करण्यात आली.

पैसे जमा करूनही पैसे परत न मिळाल्यामुळे आणि सतत नवीन पैसे भरण्याचा तगादा लावण्यात येत असल्यामुळे सागरला आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली. अखेर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात (उत्तर विभाग, पुणे) तक्रार दाखल केली.

सागरने दिलेल्या तक्रारीनुसार सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. अशा प्रकारच्या ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here