जळगाव समाचार | ४ एप्रिल २०२५
नागपूर शहरातील गोधनी प्रकाश नगर परिसरात गुरुवारी रात्री भीषण घटना घडली. गोविंद लॉनजवळ चार जणांनी भर बाजारात गोळीबार आणि चॉपरने हल्ला करत सोहेल खान (वय 35) या तरुणाची निर्घृण हत्या केली. किरकोळ वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.
या घटनेत सोहेल खान गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने मेयो रुग्णालयात नेले गेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यामध्ये मो. सुलतान उर्फ मो. शफी हे दुसरे एक व्यक्ती जखमी झाले असून त्यांच्या मानेला गोळी चाटून गेली.
पोलिसांनी धीरज घोडमारे, राजेंद्र मरकाम आणि भूषण या तिघांना अटक केली असून चौथा आरोपी चंदू डोंगरे फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे.
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही तरुणांनी घोषणाबाजी करत गाड्यांची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना घटनास्थळी बंदोबस्त तैनात करावा लागला.
भाजीची गाडी लावण्यावरून हा वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या मानकापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.