जळगाव समाचार | ४ एप्रिल २०२५
हिंगोली जिल्ह्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. हळद काढणीच्या कामासाठी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची धक्कादायक घटना आज (शुक्रवारी) सकाळी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर आलेगाव शिवारात घडली. या अपघातात १० ते १२ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
वसमत तालुक्यातील गुंज गावातील महिला व पुरुष मजूर हळद काढणीसाठी आलेगाव (जि. नांदेड) शिवारातील शेतात जात होते. यावेळी ट्रॅक्टरचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला. अपघातानंतर काही महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून 2 महिला व 1 पुरुषाचा जीव वाचला आहे.
विहिरीत पाणी असल्याने ट्रॅक्टर आणि ट्रॉली पूर्णपणे बुडाल्याचे सांगण्यात येते. पोलिस आणि महसूल विभागाच्या पथकासह आमदार राजेश नवघरे यांनीही घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू आहे.
या दुर्घटनेमुळे गुंज गावात हळहळ व्यक्त केली जात आहे आणि परिसरात शोककळा पसरली आहे.