जळगाव समाचार | २ एप्रिल २०२५
बोदवड येथून जळगावकडे येणाऱ्या दुचाकीला जळगावकडून भुसावळकडे भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात बोदवड न्यायालयात वरिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत असलेल्या योगेश बळीराम पाटील (वय ५१, रा. चैतन्य नगर, जळगाव) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. १) रात्री साडेआठच्या सुमारास नशिराबादजवळील हॉटेल सावनजवळील सर्विस रोडवर घडली.
ड्युटी संपवून घरी परतत असताना योगेश पाटील यांच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातात दुसरी दुचाकी चालवणारे मुस्तफा लतिफ खान (वय ६५, रा. भुसावळ) आणि बी. ओ. फर्नांडीस (वय ६१, रा. भुसावळ) हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच योगेश पाटील यांच्या कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांच्या निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली असून वृद्ध आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी आणि भाऊ असा परिवार त्यांच्या पश्चात आहे.