जळगाव समाचार | ३१ मार्च २०२५
सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असून, सोमवारी सोन्याने ९०,७०० रुपये प्रति तोळ्याचा नवा उच्चांक गाठला. दिवसभरात सोन्याच्या किमतीत १,००० रुपयांची वाढ झाली. गेल्या सव्वादोन महिन्यांतच सोन्याने ८० ते ९० हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे.
चांदीच्या दरातही ५०० रुपयांची वाढ झाली असून ती १,०१,५०० रुपये प्रति किलो झाली आहे. दिवाळीपासून सोन्या-चांदीच्या किमती झपाट्याने वाढत असून, ते नवनवीन उच्चांक गाठत आहेत.
सोन्याचे दर वाढत असल्याने ग्राहक संभ्रमात असून, अनेकजण खरेदी पुढे ढकलत आहेत. काही गुंतवणूकदार मात्र सोन्याच्या अधिक वाढीच्या अपेक्षेने खरेदी करत आहेत. सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर ९०,७०० रुपये प्रति तोळा, २२ कॅरेट सोन्याचा ८३,०८० रुपये, तर १८ कॅरेट सोन्याचा दर ६८,०३० रुपये प्रति तोळा आहे.
गेल्या दोन वर्षांत सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. ४ एप्रिल २०२३ रोजी सोन्याचा दर ६०,१५० रुपये होता, तर ४ एप्रिल २०२४ रोजी तो ७०,००० रुपये झाला. जानेवारी २०२५ मध्ये हा दर ८०,६०० रुपये होता आणि आता तो ९०,७०० रुपयांवर पोहोचला आहे.
सोन्याच्या दरात ही झपाट्याने वाढ होत असल्याने आगामी काळात तो १ लाखाचा टप्पा गाठणार का, याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे.