जळगाव समाचार | २९ मार्च २०२५
राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की राज्याच्या आर्थिक स्थितीमुळे पुढील तीन वर्षे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या शेतकरी मेळाव्यात ही घोषणा केली.
शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्जफेड करावी
अजित पवार यांनी शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी आपल्या कर्जाची परतफेड करावी, असे आवाहन केले. विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र राज्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते सध्या शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘लाडकी बहीण’ योजनेचा परिणाम?
राज्यात सध्या ‘लाडकी बहीण’ योजना सुरू आहे, ज्याअंतर्गत महिलांना आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेमुळे सरकार आर्थिक अडचणीत असल्यानेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मोठ्या प्रमाणात निधी या योजनेसाठी खर्च केला जात असल्याने सरकारवर आर्थिक भार पडत आहे.
नेत्यांना मागे ढकलत अजित पवारांची शिस्त
शेतकरी मेळाव्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नूतनीकरण अनावरण सोहळ्यात फोटोसाठी गर्दी झाल्याने अडचण निर्माण झाली. अजित पवार यांनी शिस्त दाखवत नेत्यांना मागे ढकलले, आणि हा प्रसंग उपस्थितांनी हसून स्वीकारला.
शेतकऱ्यांमध्ये नाराजी
शेतकऱ्यांना कर्जमाफी न मिळाल्याने त्यांच्या आशा तुटल्या आहेत, आणि सरकारच्या भूमिकेबद्दल नाराजी वाढली आहे. आर्थिक नियोजन करताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष तर होत नाही ना? असा सवाल आता उपस्थित होत आहे.