जळगाव समाचार | २७ मार्च २०२५
भुसावळ शहरात रेल्वेत नोकरी करणाऱ्या ३५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग करून सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने महिलेचा पाठलाग करत जबरदस्ती संबंध ठेवण्याचा आग्रह धरला. नकार दिल्यावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली.
पीडित महिला भुसावळच्या ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात राहते. संशयित आरोपी अब्दुल रहिम शेख (वय २७, रा. ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ) याने १ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता तसेच १५ आणि १७ मार्च रोजी सकाळी ६.३० वाजता महिलेचा पाठलाग केला. यावेळी, “माझ्याशी संबंध ठेव” असा आग्रह धरत, त्यास नकार दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली व पैशांची मागणी केली. महिलेने पैसे देण्यास नकार दिल्यावर, आरोपीने अंगावर अॅसिड टाकण्याची तसेच पती व मुलाला ठार मारण्याची धमकी दिली.
पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे. महिला सुरक्षिततेसाठी अशा घटना तात्काळ पोलिसांना कळवाव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

![]()




