जळगाव समाचार | २६ मार्च २०२५
भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट 20 मार्च रोजी झाला. परस्पर सहमतीने त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्यांच्या नात्यात दुरावा येण्यामागचं नेमकं कारण काय? याची चर्चा सुरू होती. आता एका नवीन रिपोर्टमध्ये त्यामागचं मुख्य कारण समोर आलं आहे.
एंटरटेनमेंट पत्रकार विकी लालवानी यांच्या माहितीनुसार, चहल आणि धनश्री यांच्यात “रहायचं कुठे?” या मुद्द्यावर मतभेद होते. चहलला आपल्या कुटुंबासोबत हरियाणात राहायचं होतं, तर धनश्री मुंबईत स्थायिक होण्याच्या विचारात होती. या मतभेदामुळेच दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
चहल आणि धनश्री यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया मुंबईतील वांद्रे फॅमिली कोर्टात पूर्ण झाली. IPL 2025 सुरू होण्याच्या दोन दिवस आधीच त्यांचा घटस्फोट मंजूर करण्यात आला. रिपोर्टनुसार, चहलने धनश्रीला पोटगी म्हणून 4.75 कोटी रुपये देण्याचा करार केला आहे. त्यापैकी 2.37 कोटी रुपये आधीच देण्यात आले असून उर्वरित रक्कम लवकरच दिली जाणार आहे.
दरम्यान, या घटस्फोटावर चहल किंवा धनश्री यांनी अधिकृतरीत्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्या कुटुंबीयांनीही या रिपोर्टला दुजोरा दिलेला नाही.