जळगाव समाचार | २५ मार्च २०२५
जळगाव बसस्थानकावरून चाळीसगावकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवासी आणि कंडक्टर यांच्यात वाद झाला. या वादात एका महिलेला दुखापत झाली, त्यामुळे बस अर्धा तास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थांबली.
पाचोरा डेपोची बस (एम.एच. 40 एन 9066) दुपारी 1 वाजता चाळीसगावकडे रवाना झाली. प्रवाशांची संख्या जास्त असल्याने बसमध्ये गोंधळ होता. बस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थांबली असता प्रवासी संदीप राठोड आणि त्यांची पत्नी किरण राठोड यांचा कंडक्टरशी वाद झाला. वाद वाढल्याने किरण राठोड यांच्या नाकाला मार लागून रक्तस्राव सुरू झाला.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात संपर्क केला गेला, मात्र 20 मिनिटांपर्यंत कोणीही आले नाही. त्यानंतर 112 क्रमांकावर कॉल केला असता अधिक माहिती विचारण्यात आली, परंतु त्वरित कारवाई झाली नाही. अखेर डीवायएसपी संदीप गावित यांच्याशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकारामुळे पोलिसांच्या उशिरा प्रतिसादाबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे. सध्या पोलीस राठोड दाम्पत्य आणि कंडक्टरची चौकशी करत असून पुढील तपास सुरू आहे.