जळगाव समाचार | २५ मार्च २०२५
जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे एका घराला अचानक आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाल्याने दोन भावंडांचा संसार उघड्यावर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ममुराबाद येथील पांडुरंग कुंभार आणि प्रकाश कुंभार यांचे कुंभारवाडा भागात एकत्र घर आहे. दोघेही कामावर गेले असताना त्यांच्या घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीने वेग घेतल्याने घरातील टीव्ही, पंखा, धान्य, कागदपत्रे, कपडे आणि इतर साहित्य जळून खाक झाले. या आगीत अंदाजे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घराचे रूपांतर राखेत झाल्याने भावंडांना अश्रू अनावर झाले.
भवानी पेठेत विद्युत डीपीला आग
शहरातील भवानी पेठ भागात एका सुवर्ण पेढीजवळ विद्युत डीपीला आग लागली. तसेच, संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास विसनजीनगर भागात कचऱ्याला आग लागल्याने परिसरात घबराट पसरली. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत दोन्ही ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवले.