जळगाव समाचार | २५ मार्च २०२५
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरला अटक केली आहे. तेलंगणातील मंचरियाल येथे सोमवारी दुपारी त्याला ताब्यात घेण्यात आले. आज (२५ मार्च) न्यायालयात हजर केले जाणार आहे.
या प्रकरणी कोरटकरविरोधात २५ फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला होता. सुरुवातीला जिल्हा न्यायालयाने त्याला तात्पुरता जामीन दिला होता. मात्र, पोलिसांनी उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर जिल्हा न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला.
कोरटकरचा मोबाईल त्याच्या पत्नीने पोलिस ठाण्यात जमा केल्यामुळे त्याचा शोध घेणे कठीण झाले होते. पोलिसांनी टोल नाके आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्याचा ठावठिकाणा शोधला. अखेर, कोल्हापूर पोलिसांचे पथक तेलंगणात पोहोचले आणि रेल्वे स्थानक परिसरात त्याला अटक करण्यात आली.
सुनावणीपूर्वीच अटक
प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर आज दुपारी सुनावणी होणार होती. मात्र, त्याआधीच पोलिसांनी दुपारी २.४५ वाजता त्याला अटक केली. त्यामुळे न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, अशी माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.