जळगाव समाचार | २३ मार्च २०२५
जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांत वाढ होत असताना वरणगावजवळील विल्हाळा शिवारात पतीनेच पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रविवारी (२३ मार्च) पहाटे ही घटना समोर आली. आरोपी अजीज सलीम शेख (वय ३३) हा हत्या करून पसार झाला आहे.
विल्हाळा शिवारातील विटभट्टीवर नियाजउद्दीन शेख मन्सूर हे कुटुंबासह मजुरीसाठी राहतात. त्यांच्यासोबत मुलगी सना (वय २५) आणि जावई अजीज शेखही चार मुलांसह राहत होते. अजीजला दारूचे व्यसन होते आणि तो वारंवार पत्नीशी भांडत असे. शनिवारी रात्रीही त्याने दारूच्या नशेत पत्नीला शिवीगाळ केली होती. त्यानंतर दोघे झोपले, मात्र सकाळी उठवायला गेल्यावर सना रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळली. तिच्या गळ्यावर व्रण असल्याने गळा दाबून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी सना हिच्या भावाच्या तक्रारीवरून अजीज शेखविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके तैनात केली असून त्याला लवकरच अटक केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.