जळगाव समाचार | २१ मार्च २०२५
जळगाव तालुक्यातील भादली गावात शुक्रवारी सकाळी माजी उपसरपंच युवराज कोळी (वय ३६) यांचा अज्ञात तिघांनी धारदार शस्त्राने खून केला. या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
युवराज कोळी यांचा गुरुवारी रात्री काही लोकांशी वाद झाला होता. त्याच वादातून शुक्रवारी सकाळी शेताकडे जात असताना, तिघांनी त्यांच्यावर चाकू व चॉपरने हल्ला केला आणि पळ काढला.
शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोरच हा प्रकार घडला. जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हत्या झाल्याची माहिती मिळताच नातेवाईक आणि गावकरी रुग्णालयात धावले. संतप्त जमावाने आरोपींना अटक करण्याची मागणी केली.
गावात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.