औरंगजेब कबर प्रकरणी नागपुरात दंगल; डिसिपींवर कुऱ्हाडीने हल्ला, शहरात तणाव…

जळगाव समाचार | १८ मार्च २०२५

औरंगजेबाच्या कबरीवरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या महाल परिसरात सोमवारी रात्री मोठा गोंधळ झाला. दोन गटांमध्ये जोरदार दगडफेक झाली, तसेच अनेक वाहनांची तोडफोड व जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र जमावाने पोलिसांवरच दगडफेक करत त्यांच्या गाड्यांनाही आग लावली.

या घटनेत अनेक नागरिक व पोलिस कर्मचारी जखमी झाले असून, डीसीपी निकेतन कदम यांच्यावरही कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि दंगा नियंत्रक पथकाला पाचारण केले. पोलिसांनी आतापर्यंत २० हून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे.

मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांचे शांततेचे आवाहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. फडणवीस म्हणाले, “नागपूर हे शांतताप्रिय शहर आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पोलिसांना सहकार्य करावे.”

नागपुरातील या घटनेनंतर मुंबईतही पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. संवेदनशील भागांमध्ये सतर्कता ठेवण्यात येत असून, पोलिसांनी सर्व धर्मिय नेत्यांशी संपर्क साधून शांततेचे आवाहन केले आहे.

नागपूरचे डीसीपी अर्चित चांडक यांनी सांगितले की, ही घटना गैरसमजातून घडली असून परिस्थिती आता नियंत्रणात आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे त्यांनी सांगितले. सध्या नागपूरमध्ये तणाव कायम असून, सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here