धाराशिव जिल्ह्यात मोठी कारवाई; 542 ग्रामपंचायत सदस्य अपात्र…

जळगाव समाचार | १५ मार्च २०२५

धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे जिल्ह्यात तसेच राज्यभरात खळबळ उडाली आहे. जात वैधता प्रमाणपत्र न सादर केल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील तब्बल 542 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव असलेल्या ग्रामपंचायत जागांवरील निवडून आलेल्या सदस्यांना निवडीनंतर 12 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. मात्र, अनेकांना सूचना दिल्यानंतरही त्यांनी प्रमाणपत्र दिले नाही. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 10(1-अ) नुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ही मोठी कारवाई केली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील अनेक सदस्यांना आपले पद गमवावे लागले आहे:
• उमरगा – 145
• तुळजापूर – 97
• भूम – 85
• परंडा – 71
• धाराशिव – 55
• वाशी – 40
• कळंब – 27
• लोहारा – 22

धाराशिव जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजारी यांनी 12 मार्च रोजी हा आदेश दिला आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, अपात्र झालेले सदस्य न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here