जळगाव समाचार | १५ मार्च २०२५
चाळीसगाव शहरातील जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. शाळेचे सचिव, मुख्याध्यापक आणि क्लार्क यांनी संगनमत करून १५ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारातून तब्बल ९७ लाख रुपये कपात केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी चाळीसगाव पंचायत समितीचे तालुका विस्तार अधिकारी विलास आनंदा भोई (वय ५०, रा. उंटवाडी, तिळकेनगर, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक विकास मंडळ संचलित जय हिंद विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगार अनुदानातून मोठ्या प्रमाणात पैसे कपात करण्यात आले.
शाळेचे सचिव अशोक हरी खलाणे (रा. नेताजी चौक, चाळीसगाव), मुख्याध्यापक अभिजीत जगन्नाथ खलाणे (रा. धुळे रोड, चाळीसगाव) आणि क्लार्क ज्ञानेश्वर दगा महाजन (रा. तेजस कोणार्क, धुळे रोड, चाळीसगाव) यांनी संगनमत करून हा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे.
२००६ ते २०२४ दरम्यान शिक्षकांच्या पगारातून मोठ्या प्रमाणात कपात
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, संबंधित पदाधिकाऱ्यांनी २००६ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या पगारातून मोठी रक्कम कपात केली. काही शिक्षकांना नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देऊन जबरदस्तीने संमतीपत्रावर सह्या करवून घेण्यात आल्या, तर काही शिक्षकांची कुठलीही परवानगी न घेता त्यांच्या वेतनातून पैसे कपात करण्यात आले. हा प्रकार शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून करण्यात आला.
या गैरव्यवहारामुळे शिक्षकांमध्ये तीव्र संताप असून, शिक्षण संस्थांमध्ये होणाऱ्या अशा प्रकारच्या आर्थिक गैरव्यवहारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी सचिव, मुख्याध्यापक आणि क्लार्क यांच्याविरोधात फसवणुकीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत असून, दोषींवर कडक कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.