जळगाव समाचार | १२ मार्च २०२५
एरंडोल तालुक्यातील एका ग्रामीण शाळेत मंगळवारी (११ मार्च २०२५) एका १५ वर्षीय विद्यार्थिनीची शिक्षकाने छेडछाड केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे गावासह संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश हरी पाटील (वय ५५, रा. पाचोरा) या शिक्षकाने शाळा सुरू असताना विद्यार्थिनीला शिक्षक दालनात बोलावले आणि तिची छेडछाड केली. या कृत्यामुळे विद्यार्थिनीला मानसिक धक्का बसला असून, पालकांनी तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. आरोपी मंगेश पाटील याला अटक करण्यासाठी पाचोरा येथे पोलीस पथक रवाना झाले आहे. दरम्यान, अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) विनायक कोते यांनी एरंडोल पोलीस ठाण्याला भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
या प्रकारामुळे “बेटी बचाव, बेटी पढाओ” यासारख्या सरकारी मोहिमांना धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे. शिक्षकानेच पवित्र शाळेच्या ठिकाणी विद्यार्थिनीची छेडछाड केल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे.