जळगाव समाचार | ६ मार्च २०२५
अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यातील मिलवॉकी शहरात दरोडेखोरांनी गोळ्या झाडून भारतीय विद्यार्थी गम्पा प्रवीण कुमार (वय २७) यांची हत्या केली. ते तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील रहिवासी होते आणि विस्कॉन्सिन विद्यापीठात डेटा सायन्समध्ये एमएस करत होते.
प्रवीण कुमार शिक्षणासोबत एका स्थानिक दुकानात अर्धवेळ काम करत होते. मंगळवारी रात्री दुकानात दरोडेखोर घुसले आणि गोळीबार केला, त्यात प्रवीण यांचा जागीच मृत्यू झाला.
बुधवारी सकाळी प्रवीण यांच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबावर शोककळा पसरली. त्यांचे वडील गम्पा राघवुलू यांना पहाटे व्हॉट्सअॅपवर अनोळखी कॉल आला. त्यांनी कॉल उचलला नाही, पण नंतर कोणीतरी सांगितले की त्यांना प्रवीण यांचा फोन सापडला आहे. हे ऐकल्यावर कुटुंबाला संशय आला आणि त्यांनी तात्काळ त्याच्या मित्रांशी संपर्क साधला.
प्रवीण यांनी हैदराबादमध्ये बीटेक पूर्ण केल्यानंतर, ऑगस्ट २०२३ मध्ये अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी गेले होते. त्यांचे शिक्षण अवघ्या चार महिन्यांत पूर्ण होणार होते आणि त्यानंतर ते पूर्णवेळ नोकरी करणार होते.
या घटनेबाबत भाजप नेते एन. रामचंदर राव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले, “अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले वाढत आहेत. अमेरिकन सरकारने स्थलांतरितांचे संरक्षण करावे आणि कठोर उपाययोजना कराव्यात.”
या हत्येमुळे भारतीय समुदायात संताप व्यक्त केला जात आहे. अमेरिकेत भारतीयांचे मोठे योगदान असूनही अशा घटनांमध्ये वाढ होत आहे, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
प्रवीण कुमार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, भारतीय सरकारनेही या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.