जळगाव समाचार | ४ मार्च २०२५
टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी करत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. मंगळवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा ४ विकेट्सने पराभव केला. या विजयात ‘चेस मास्टर’ विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावत सामनावीराचा किताब पटकावला. त्याने ८४ धावांची अप्रतिम खेळी केली.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २६५ धावांचे लक्ष्य ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना कोहलीने ३ महत्त्वाच्या भागीदारी केल्या. श्रेयस अय्यरसोबत ९१, अक्षर पटेलसोबत ४४ आणि केएल राहुलसोबत ४७ धावा जोडत त्याने भारताचा विजय सोपा केला. शेवटी, हार्दिक पंड्याने फटकेबाजी करत २८ धावा झळकावल्या. केएल राहुलने षटकार लगावत सामना संपवला आणि तो ४२ धावांवर नाबाद राहिला.
ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टीव्ह स्मिथने ७३ आणि अॅलेक्स कॅरीने ६१ धावा केल्या. मात्र, भारतीय गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करत संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाला बाद केले. मोहम्मद शमीने ३, तर रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. या विजयासह टीम इंडियाने अंतिम फेरीत प्रवेश केला असून आता सर्वांचे लक्ष अंतिम सामन्यावर केंद्रित झाले आहे.