जळगाव समाचार | ४ मार्च २०२५
चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाजवळ मंगळवारी (४ मार्च) सकाळी ट्रक आणि आयशर वाहनाची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात आयशर चालक समाधान मेघराज पाटील (रा. तांबोळा खुर्द) यांचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रकचालकासह आणखी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे समोरील भाग पूर्णपणे चुरडले गेले. जखमींना बाहेर काढण्यासाठी जेसीबी आणि क्रेनचा वापर करावा लागला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले.
या अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक तब्बल एक तास ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली. अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास चाळीसगाव पोलीस करत आहेत.