छेडखानी प्रकरणी समस्त लेवा पाटीदार पंच श्रीराम मंदिर संस्थानची कारवाईची मागणी…

जळगाव समाचार | ३ मार्च २०२५

रावेर मतदारसंघाच्या खासदार तसेच केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणींसोबत मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील यात्रोत्सवात गुंडांकडून घडलेल्या छेडखानीच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत समस्त लेवा पाटीदार पंच श्रीराम मंदिर संस्थान असोदाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनात दि.२८ फेब्रुवारी रोजी मुक्ताईनगर तालुक्याकील कोथळी येथील यात्रेमध्ये अनिकेत व इतर मुलांनी मुलींचा पाठलाग करुन त्यांची छेडछाड केली. केंद्रीय मंत्र्याच्याच मुली जिथे सुरक्षित नाहीत तेथे इतर सर्वसामान्य मुलींचे काय असा सवाल विचारला आहे. ही घटना आपल्या जिल्ह्यातील महिलांच्या अस्मितेचा घोर अपमान करणारी आहे. समस्त लेवा पाटीदार पंच, श्रीराम मंदीर संस्थानतर्फे सदर घटनेचा निषेध करत उपरोक्त दोषी मुलांना ताब्यात घेवून जास्तीत जास्त कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी जळगाव येथील विठ्ठल मंदिर संस्थान चे सचिव राजेश खडके आणि माजी उपमहापौर सुनील खडकेसुद्धा यावेळी उपस्थित होते. निवेदनावर समस्त लेवा पाटीदार पंच श्रीराम मंदिर संस्थान असोदाचे चेअरमन सुदाम चौधरी, कृ.ऊ.बा. समितीचे माजी सभापती दुर्गादास भोळे, असोदा दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन खेमचंद्र महाजन, प्रकाश पंडीत महाजन, दशरथ महाजन, अनिकेत भोळे, दुर्गादास भोळे, विलास सावदेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here