जळगाव समाचार | १ मार्च २०२५
टोळी गावातील शिवनंदन शालिक पवार (वय ३६) या व्यक्तीला एका महिलेस लग्नाचे आमिष दाखवून फसवणे आणि तिच्यावर अत्याचार केल्याच्या प्रकरणी अमळनेर न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
८ नोव्हेंबर २०२० रोजी आरोपीने पीडित महिलेस लग्नाचे आमिष दाखवले आणि जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या घटनेनंतर महिलेस न्याय मिळावा म्हणून पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून १९ नोव्हेंबर २०२० रोजी आरोपीला अटक केली. तेव्हापासून तो तुरुंगात होता.
हा खटला अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सौ. सी. व्ही. पाटील यांच्या न्यायालयात चालला. सरकारी वकील आर. बी. चौधरी यांनी एकूण २६ साक्षीदार तपासले. यात पीडितेच्या मृत्यूपूर्वी तिने आई आणि बहिणीला सांगितलेल्या माहितीस महत्त्व दिले गेले. तसेच, धुळे येथील वैद्यकीय अधिकारी आर. के. गढरी यांच्या अहवालाने हे आरोप अधिक बळकट केले.
न्यायालयाने भादंवि कलम ३७६ अंतर्गत आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. मात्र, इतर कलमांतून आरोपी निर्दोष मुक्त करण्यात आला.
या खटल्यात पैरवी अधिकारी सहायक फौजदार उदयसिंग सांळुके, पोलीस हेडकॉन्स्टेबल पु. शा. वाल्डे, प्रमोद पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल भरत इशी व राहुल रणधीर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

![]()




