धक्कादायक! रील्स स्टार मुलाचा छळ सहन न झाल्याने आधी त्याचा खून मग वडिलांनीही केली आत्महत्या…

जळगाव समाचार | २७ फेब्रुवारी २०२५

जळगाव जिल्ह्यात सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या रील्स स्टार तरुणाचा त्याच्या वडिलांनी गळा आवळून खून केला आणि नंतर स्वतः आत्महत्या केली. वडिलांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे या धक्कादायक घटनेचा उलगडा झाला. गुरुवारी (27 तारखेला) ही घटना उघडकीस आली.

विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील (22, रा. भवरखेडा, ता. धरणगाव, सध्या मुक्काम एरंडोल) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याचे वडील विठ्ठल पाटील (माजी सैनिक, रा. एरंडोल) यांनी आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, हितेश सोशल मीडियावर प्रसिद्ध होता आणि लाखो फॉलोअर्स होते. मात्र, कौटुंबिक कारणांमुळे तो वडिलांपासून वेगळा राहत होता. दारूच्या नशेत तो वारंवार वडिलांना मारहाण करत होता. या छळाला कंटाळून माजी सैनिक असलेल्या विठ्ठल पाटील यांनी मंगळवारी (25 तारखेला) गळफास घेऊन आत्महत्या केली.

वडिलांच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीत त्यांनी मुलाचा खून केल्याची कबुली दिली होती. या चिठ्ठीत त्यांनी लिहिले होते की, सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी मुलाचा खून करून मृतदेह भवरखेडा गावाजवळील नाल्यात पुरला.

पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर गुरुवारी तरुणाचा मृतदेह सापडला. घटनास्थळी एक सुती दोरी आढळली असून, त्याच्या मदतीने हितेशला गळफास लावण्यात आला असावा, असा संशय आहे. शवविच्छेदनानंतर नेमके कारण स्पष्ट होईल, असे अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी सांगितले.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते आणि इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

एरंडोल पोलीस ठाण्यात मयत वडिलांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here