जळगाव समाचार | २७ फेब्रुवारी २०२५
प्रसिद्ध अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वाद आता मिटला असून, त्यांनी घटस्फोटाचा निर्णय मागे घेतला आहे. ही माहिती गोविंदाचे वकील ललित बिंदल यांनी दिली. सुनीता यांनी सहा महिन्यांपूर्वी कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, आता दोघांनीही वाद सोडवून नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.
गोविंदा आणि सुनीता यांनी या वर्षी नवीन वर्ष साजरे करण्यासाठी नेपाळला भेट दिली होती. या प्रवासादरम्यान, त्यांनी पशुपतिनाथ मंदिरात एकत्र पूजा केली. त्यानंतर त्यांच्यातील मतभेद मिटल्याचे त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केले.
यापूर्वी माध्यमांमध्ये असे वृत्त आले होते की, ६१ वर्षीय गोविंदाचे एका ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत प्रेमसंबंध आहेत, त्यामुळेच सुनीता ३७ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेऊ इच्छित होती. मात्र, या संदर्भात सुनीता यांनी कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.
गोविंदा यांनी या संपूर्ण प्रकरणावर अधिक बोलण्यास नकार दिला. ते म्हणाले, “सध्या व्यावसायिक चर्चा सुरू आहेत. मी माझा नवीन चित्रपट सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहे.”
दरम्यान, गोविंदाचे व्यवस्थापक शशी सिन्हा यांनीही या चर्चा अफवा असल्याचे सांगितले. “हे फक्त एक पब्लिसिटी स्टंट आहे. गोविंदा नवीन चित्रपट बनवत आहेत, मात्र सुनीता त्याच्या निर्णयाशी सहमत नव्हत्या. त्यामुळेच अशा चर्चा सुरू झाल्या. त्यांनी यापूर्वीही गोविंदाच्या कामावर नाराजी व्यक्त केली होती,” असे सिन्हा म्हणाले.
गोविंदाचा भाचा आणि प्रसिद्ध विनोदी कलाकार कृष्णा अभिषेकनेही या विषयावर प्रतिक्रिया दिली. त्याने सांगितले, “माझ्या मामाचे आणि मामीसाहेबांचे नाते खूप मजबूत आहे. त्यांच्यात काही मतभेद झाले असतील, पण ते इतक्या सहज वेगळे होणार नाहीत. त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे.”
माध्यमांमध्ये असेही म्हटले जात आहे की, जर गोविंदा आणि सुनीता यांचा घटस्फोट झाला असता, तर त्याला ‘ग्रे घटस्फोट’ म्हणता आले असते. अमेरिका आणि युरोपमध्ये २५ ते ४० वर्षांच्या सहजीवनानंतर होणाऱ्या घटस्फोटाला ‘ग्रे घटस्फोट’ असे संबोधले जाते. मात्र, आता ही चर्चा निरर्थक ठरली आहे.
गोविंदा आणि सुनीता यांची प्रेमकहाणीही तितकीच रोचक आहे. दोघांची पहिली भेट एका कौटुंबिक समारंभात झाली. त्यावेळी सुनीता नववीत तर गोविंदा बी.कॉमच्या शेवटच्या वर्षात होते. त्यानंतर त्यांनी तीन वर्षे एकमेकांना डेट केले आणि लग्नगाठ बांधली. आज त्यांच्या नात्यातील वाद मिटला असून, दोघेही नव्या पर्वाची सुरुवात करत आहेत.