जळगाव समाचार | २७ फेब्रुवारी २०२५
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, पुण्यातील घटना ताजी असतानाच नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका नराधम बापानेच आपल्या तीन मुलींवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे, मोठ्या मुलीचा तब्बल चार वेळा गर्भपात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पीडित मुलींनी अखेर धाडस करून नालासोपारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीवर आधीच खंडणी, गोळीबार आणि हत्या प्रकरणी गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
पीडित मुली मूळ कोकणातील असून, त्या आपल्या आई-वडिलांसह तेथे राहत होत्या. मात्र, वडील सातत्याने त्यांच्यावर अत्याचार करत होते. यातून मोठ्या मुलीला चार वेळा गर्भपाताचा सामना करावा लागला. अखेर अत्याचाराला कंटाळून आईने पाचही मुलींना घेऊन नालासोपाऱ्यात नातेवाईकांकडे आसरा घेतला.
यानंतर 21 वर्षीय मोठ्या मुलीने हिंमत करून पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. तिच्या दोन अल्पवयीन बहिणींवरही अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण आहे. पीडित मुली म्हणाल्या, “वडील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याने आम्हाला त्यांची भीती वाटत होती. पण वारंवार होणाऱ्या अत्याचारामुळे आम्ही शेवटी धाडस केले.”
सध्या पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.