स्वारगेट बसस्थानकात महिलेवर अत्याचार; सर्व सुरक्षा रक्षक निलंबित…

जळगाव समाचार | २६ फेब्रुवारी २०२५

स्वारगेट बसस्थानक परिसरात मंगळवारी पहाटे एका महिलेवर अज्ञात व्यक्तीकडून अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

ही घटना स्वारगेट बसस्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही एसटी बसमध्ये घडली. पीडित महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणी तातडीने पाऊले उचलत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी) विवेक भीमनराव यांना संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
• या बसस्थानकावरील स्थानकप्रमुख (सहाय्यक वाहतूक अधीक्षक) आणि आगार व्यवस्थापक यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
• चौकशीअंती दोष आढळल्यास दोघांना तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
• बसस्थानकावरील सर्व सुरक्षा रक्षक तात्काळ बदलून त्यांच्या जागी नवीन सुरक्षा रक्षक तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.
• या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सात दिवसांत सादर करण्यास सांगितले आहे.

स्वारगेट बसस्थानकावरील घटनेच्या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उद्या एसटीच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत. या बैठकीत महिला सुरक्षेसंदर्भात महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

सध्या ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत महिलांना त्यांच्या प्रवास तिकिटामध्ये ५० टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे महिला प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षिततेसाठी लवकरच ठोस उपाययोजना केली जाणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here