जळगाव समाचार | २६ फेब्रुवारी २०२५
कासोदा पोलिसांनी २५ फेब्रुवारी रोजी वनकोठे गावाजवळ सापळा रचून १९ किलो गांजासह एका तस्कराला अटक केली. आरोपीकडून २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरोधात कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गेल्या पाच दिवसांपासून वेषांतर करून पाळत ठेवली होती. २५ फेब्रुवारी रोजी संशयित हालचाली आढळल्याने पोलिसांनी आरोपी अजय रविंद्र पवार (वय २७, रा. सोनबर्डी, ता. एरंडोल) याला अडवले. तपासणीदरम्यान त्याच्याकडे खाकी टेपने पॅक केलेले १९ किलो गांजाचे पुडे सापडले.
या प्रकरणी पोहेकॉ. नंदलाल परदेशी यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश राजपूत, पोउनि दत्तू खुळे, पोहेकॉ नंदलाल परदेशी, पोना अकील मुजावर, किरण गाडीलोहार, नरेंद्र गजरे, पोकॉ समाधान तोंडे आणि लहु हटकर यांनी केली. पुढील तपास सपोनि निलेश राजपूत करत आहेत.

![]()




