जळगाव समाचार | २५ फेब्रुवारी २०२५
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. आष्टी येथील २४ वर्षीय गरोदर महिला सुनिता दुर्गेश सोयाम हिचा गर्भातील बाळासह उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना २४ फेब्रुवारी रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास घडली.
सुनिता सोयाम या नऊ महिन्यांची गरोदर होती. तिला २३ फेब्रुवारी रोजी प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या, त्यामुळे तिच्या पतीने तिला सर्वप्रथम नाकाडोंगरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी ‘प्रसूतीला अजून वेळ आहे’ असे सांगून तिला घरी पाठवले.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच २४ फेब्रुवारी रोजी तिला तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यामुळे तिला तातडीने तुमसर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिला भरती करून उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सुनिता हिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाला आणि काही वेळानंतर सुनिता हिचाही मृत्यू झाला.
सुनिता हिचा मृत्यू प्रसूतीदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितिन मिसुरकर आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मेहबुब कुरैशी यांनी दिली.
सुनिता हिचे माहेर मध्यप्रदेशमधील देवठाणा येथे होते. तिचे एक वर्षापूर्वी आष्टी येथील दुर्गेश सोयाम याच्यासोबत लग्न झाले होते. ही तिची पहिलीच गर्भधारणा होती. मात्र, प्रसूतीच्या वेळीच तिला आणि बाळाला आपला जीव गमवावा लागला.
शवविच्छेदनानंतर सुनिता हिचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. संध्याकाळी ५ वाजता आष्टी येथील स्मशानभूमीत तिच्यावर शोकमग्न वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेमुळे संपूर्ण तुमसर तालुका हादरला आहे. नाकाडोंगरी प्राथमिक आरोग्य केंद्राने जर वेळीच योग्य उपचार दिले असते, तर कदाचित या दुर्दैवी घटनेला टाळता आले असते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच या घटनेचा पुढील तपशील स्पष्ट होईल.