जळगाव समाचार | २४ फेब्रुवारी २०२५
छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. हे किल्ले केवळ ऐतिहासिक ठेवा नसून, महाराष्ट्रातील नागरिकांसाठी श्रद्धेचे केंद्रही आहेत. आता या किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न सुरू झाले आहेत.
राज्य शासनाने ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ (Maratha Military Landscape of India) या संकल्पने अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ रविवारी पॅरिसला रवाना झाले आहे.
या १२ किल्ल्यांचा समावेश
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट होण्यासाठी पुढील १२ किल्ल्यांचा प्रस्ताव देण्यात आला आहे:
1. रायगड
2. राजगड
3. प्रतापगड
4. पन्हाळा
5. शिवनेरी
6. लोहगड
7. साल्हेर
8. सिंधुदुर्ग
9. सुवर्णदुर्ग
10. विजयदुर्ग
11. खांदेरी किल्ला
12. तमिळनाडूतील जिंजी किल्ला
गडकिल्ल्यांना जागतिक प्रसिद्धी मिळणार
शिवप्रेमींनी अनेक वर्षांपासून गड-किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळावा, अशी मागणी केली होती. युनेस्कोचा दर्जा मिळाल्यास, हे किल्ले जागतिक पातळीवर अधोरेखित होतील आणि महाराष्ट्रातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा संपूर्ण जगासमोर पोहोचेल, असेही सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे शिवछत्रपतींचा ऐतिहासिक वारसा जागतिक स्तरावर नोंदवला जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.