जळगाव समाचार | २३ फेब्रुवारी २०२५
ओव्हरटेक करण्यावरून झालेल्या वादात आयटी प्रोफेशनल शिवकुमार रोशनलाल शर्मा (वय ३२) यांचा हेल्मेटने डोक्यावर वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना ३ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता खारघर परिसरात घडली होती. या प्रकरणी मारहाण करणारे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. मात्र, नवी मुंबई पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे मुख्य आरोपी फैझान शेख याला अटक केली असून न्यायालयाने त्याला २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
३ फेब्रुवारी रोजी रात्री बेलपाडा ते उत्सव चौक या मार्गावर दोन दुचाकीस्वारांमध्ये ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. हा वाद हाणामारीत बदलला आणि दोन तरुणांनी शिवकुमार शर्मा यांच्या डोक्यावर हेल्मेटने वारंवार प्रहार केले. गंभीर जखमी अवस्थेतही शिवकुमार यांनी स्वतः दुचाकी चालवत खारघर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी पोलिसांना संपूर्ण घटना सांगून तक्रार नोंदवली. मात्र, तक्रार नोंदवतानाच ते अचानक बेशुद्ध झाले. पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर खारघर पोलिसांनी तपास सुरू केला. मारहाण करताना शिवकुमार शर्मा यांना पकडून ठेवणारा रेहान शेख याला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. मात्र, हेल्मेटने वार करणारा मुख्य आरोपी फैझान शेख हा फरार होता. अखेर सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी फैझान शेख याला बांद्रा येथून अटक केली.
फैझान शेख याला पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.